१३ जुलै १६६०
या दिवसाची आठवण आली की आंम्हा भोरकरांची छाती अभिमानाने फुगते. भोरच्या मातीत जन्मलेले बाजी प्रभू देशपांडे यांचा आज स्मृतीदिन. इतिहासात डोकावताना भोरच्या या वीर योद्धाचे स्मरण करताना भोरचे सुपुत्र म्हणून आमची मानही अभिमानाने ताठ होते. बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी आपली निष्ठा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पिली. बाजीप्रभू हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच तसेच ते त्यागी, स्वामीनिष्ठ, करारी, कोणत्याही अमिषाला बळी न पडणारे होते. आंम्हा भोरकरांना त्यांचा अभिमान आहे.
त्यांच्या स्मृतींना मानवंदना देत आजपासून राजगड टाइम्स हे ऑनलाईन बातमीपत्र सुरू करीत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्याची शपथ राजांनी भोर तालुक्यातील रायरेश्वरावर घेतली. स्वराज्याची पहिली राजधानी म्हणूनही भोर तालुक्यातील राजगडावरून कारभार केला. भोर हे ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील विद्यामान राज्यातील एक संस्थान. उत्तरेस महादेव डोंगर, पश्चिमेस कुलाबा जिल्हा, दक्षिणेस व पूर्वेस पुणे आणि सातारा यांनी ते सीमांकित होते. यात विचित्रगड, राजगड, प्रचंडगड, पौनमावळ व सुधागड हे पाच जिल्ह्याांचा समावेश होता व भोर व शिरवळ ही दोन शहरं व पाचशे दोन खेडी या भोर संस्थानात होती. एवढा मोठा कारभार पंतसचिवांनी भोरच्या राजवाड्यातून पाहिला. ८ मार्च १९४८ रोजी भोर संस्थान मुंबई राज्यात विलीन झाले. एवढी मोठी एतिहासिक परंपरा दुसºया कोण्याच्याही वाट्याला आली नाही. ते भाग्य आपल्या भोरकरांना मिळाले आहे.
पण
आज विकासाच्या नकाशात भोर कुठे आहे? हा प्रश्न भोरचे सुपूत्र म्हणून आंम्हाला पडला आहे. या प्रश्नाचेच उत्तर शोधण्यासाठी आंम्ही आमची सुरुवात या भोरच्या पवित्र भुमीतून करीत आहोत. राजगड टाइम्स सजग नागरिक बनून भोरच्या विकासवारीत आपल्या सर्वांच्या पाठबळावर खारीचा वाटा नक्कीच टाकेल. गरज आहे ती भारेकरांच्या पाठिंब्याची.
राजगड टाइम्स काय करेल....
आमचे माध्यम हे बातमी आहे. पण फक्त बातमी देऊन आम्ही थांबणार नाही. बातमीच्या मागे व पुढे काय आहे, हेही आपल्यापर्यंत पाहचविण्याचे काम करू. ज्यातून प्रत्येकाला व्यक्त होता येईल व आपले एक मत तयार होईल.
फक्त बातम्या देणं हेच आमचं काम नसले. इतिहासाचं पान भोरशिवाय पलटत नाही. ही आपली ऐतिासिक परंपरा आंम्ही आपल्यापर्यंत पोहचविण्याचे काम करू.
भोर हा निसर्ग सौंदर्य लाभालेला तालुका आहे. पर्यटन हा सध्या देशात महत्वाचा विषय आहे. यासाठी अनेक योजना केंद्र व राज्य पातळीवर आहेत व भविष्यात येऊ घातल्या आहेत. या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहचवणे हे आमचे काम असेल. तालुक्याचा पर्यटन केंद्रीत विकास झाला तर स्थानिकांना रोजगार मिळेल व त्यांचे जीवनमान बदलेल.
शेती हे खरं तर आपल्या तालुक्यात तसा दुय्यम क्षेत्र. कारण तालुक्याची रचनाच तशी आहे. महामार्ग पट्ट्यात तशी चांगली शेती असून त्यातून उत्पन्नही चांगले घेतले जाते. मात्र तालुक्याचा बहुतांश भाग हा डोगररांगांचा आहे. त्यामुळे पावसावर अवलंबून भातपीक हे एकमेव पीक घेतले जाते. त्यावर उदरनिर्वाह अशक्यच. पाण्याचे स्त्रोत नाहीत. पाण्याची टाकी म्हणजे धरणं आहेत, मात्र त्यावर आपला अधिकारी नाही. पण या पाण्यावर पहिला अधिकार आपलाच आहे. पण तो आपण आजपर्यंत दाखवला नाही. लोकशाही मार्गाने त्यावर हक्क सांगणे गरजेचे आहे. यातून दुबार पीक घेतले जाऊ शकते. तसेच शेतीशी संबंधित जोडधंदा केला तर उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून या संबंधिच्या योजना आपल्यापर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असेल.
नोकरी व शेतीशिवाय उद्याोग व्यवसायातही आपला माणूस उतरला पाहिजे. यासाठी स्टार्टअप म्हणून कोणते उद्याोग सुरू करता येतील यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबर त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहचविण्याचे काम आंम्ही करू.
ग्रामविकास हा खरं तर आमच्या आवडीचा विषय. गावाचा विकास झाला तर देशाचा नक्कीच होईल. यावर आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे गाव विकासासाठी शासनाच्या विविध योजना गावकारभाºयांपर्यंत पोहचवण्याचे काम आमचे असेल.
करोना संकाटामुळे विकासाच्या संकल्पनाच बदलून गेल्या आहेत. शाश्वत काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यातून एक उत्तर समोर येते ते आपलं गाव. यामुळे यापुढे विकासाची दिशाही गाव केंद्रीत हवी. प्रत्येक गावात साधारण तीन शासकीय यंत्रणा म्हणजे शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र व टपाल कार्यालय असते. शिक्षण,आरोग्य व पैसा या तीन गोष्टी खूप महत्वाच्या असतात. पण अतिशय महत्वाच्या असूनही या यंत्रणा धूळखात पडून आहेत. गावात शाळा आहे पण दर्जा नसल्याने आपली पारं शहरात शिकत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती आहेत पण तेथे चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. टपाल कार्यालय आहे, पण ते कोणाच्या तरी घरात कोपºया कूलूप लावून बंद आहे. ही स्थिती यापुढे बदलणे काळाची गरज आहे. यासाठी राजगड टाईम्स हे एक चळवळ म्हणून काम करेल.
यांसह असे अनेक हेतू आहेत की आंम्ही तुमच्यासाठी समाजमाध्यमातून काम करण्यासाठी पुढे येत आहोत. गरज आहे ती आपल्या सूचना व पाठिंब्याची. हे एक फक्त बातमीपत्र न होता ती चळवळ व्हावी, हाच हेतू.
-मी एक भोरकर
1 Comments
राजगड टाईम्स... शुभारंभ.... अभिनंदन.
ReplyDeleteवाचनीय बातम्या, अभ्यासपूर्ण लेख आणि दर्जेदार साहित्यांचे मिश्रण या अंकामध्ये पाहावयास मिळेल . या अंकाचे भोर,वेल्हा तालुक्याचे जुने नाते जोपासले जाणार आहे. त्यामुळे यामधील बातम्यांचे संदर्भ काम करताना मार्गदर्शक बनतील.
साहेब, अशीच चांगली पत्रकारिता सदैव तुमच्या हातून घडो. त्यासाठी राजगड टाईम्सच्या या शुभारंभ अंकास व सर्व टीमला शुभेच्छा.