प्रशासन आजारी; आरोग्य व्यवस्थेला प्राणवायूची गरज
भोर : भोर तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा एक हजार झाला असून 35 जणांचा मृत््यू झाला आहे. रुग्णवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनातील जवळपास पन्नास ते साठ जण बाधित झाले आहेत. जिल्हा परिषदेकडून कर्मचारी आयात करण्याची वेळ आली आहे. आरोग्य अधिकारी स्वत: करोनाग्रस्त आहेत.भोर तालुक्याची करोनाने अशी चारी बाजूने कोंडी केली आहे.
यावर प्रशासनाने जग अॅनलॉक होत असताना भोर लॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना काळातील स्थानिक पातळीवरील हा तिसरा बंद असल्याने अजून किती वेळा बंद करणार म्हणजे करोना संपणार आहे, असा प्रश्न आता भोरची जनता विचारू लागली आहे.
भोर शहरात टाळेबंदीच्या काळात करोनाचा प्रादुभाव कमी होता. टाळेबंदी हळूहळू शिथील झाल्यानंतर करोनाचा संसर्ग पसरू लागला. यात एकतर मुंबई, पुण्यातून गावाकडे आलेले नागरिक व नोकरी, धंद्याानिमित्त बाहेर पडणारे व दररोज परत येणारे नागरिक हे हळूहळू करोनाचे वाहक बनून शहर व तालुक्यात करोनाचा संसर्ग वाढू लागला. भोर तालुक्यात सध्या एकूण एक हजार बाधितांपैकी 345 रुग्ण उपचार घेत असून 35 जणांचा मृत््यू झाला आहे.
- भोर शहर
- एकूण रुग्ण : 213
- बरे रुग्ण 129
- उपचार सुरू : 79
- एकूण मृत्यू : 5
- भोर तालुका
- एकूण रुग्ण : 787
- बरे रुग्ण 492
- उपचार सुरू : 266
- एकूण मृत्यू : 30
विशेष म्हणजे शहरातील प्रशासनच आजारी पडल्याचे चित्र आहे. यात आरोग्य अधिकारी यांनाच करोना झाला आहे. तसेच पंचायत समिती, तहसील कार्यालय, पोलीस यांच्यासह विविध विभागातील पन्नास ते साठ कर्मचारी करोनागस्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातीलही अनेकांना अलगीकरणात ठेवले आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेतील कर्मचारी भोरसाठी आयात करावे लागले आहेत. 54 कर्मचारी विविध विभागात हजर झाले आहेत.
अगदी काही दिवसापर्यंत सुस्त असलेले प्रशासन व लोकप्रतिनिधी आता जागे झाल्याचे चित्र आहे. गेली अनेक दिवस रुग्णसंख्या कमी असल्याने मोजक्या म्हणजे दोनच करोना काळजी केंद्र व उपजिल्हा रुग्णालय एवढ्या व्यवस्थेवर विसंबून राहिलेले प्रशासन आता कामाला लागले असून नियोजन करू लागले आहे. सुरुवातील एटी कॉलेज व आयटीआयमध्ये करोना काळजी केंद्र होते. मात्र या ठिकाणच्या व्यवस्थेबद्दल आतापर्यंत अनेकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता नव्याने शहरातील मुकबधिर विद्याालय रथखाना येथे 150 खाटांची, पुणे सातारा महामार्गावरील युनिव्र्हसल महाविद्याालयाच्या वस्तीगृहात 100 खाटांची व्यवस्था करण्या आली आहे. तर उपजिल्हा रुग्णालयात प्राणवायू व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या 60 खाटा तर नसरापूर येथील सिद्धीविनायक या खासगी रुग्णालयात 75 खाटांची व्यवस्था केली आहे. आता भोर तालुक्यासाठी 516 खाटांचे नियोजन असून 115 खाटा या अत्यावश्यक रुग्णांसाठी आहेत. मात्र आता तालुक्यात करोनाचा प्रसार वाढू लागल्याने ही व्यवस्थाही किती पुरेल याबाबतही शंका उपस्थित होत आहे.
सात दिवस कडकडीत बंद
भोर शहरात वाढत्या करोनाबाधितांमुळे शहर सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार दि. १३ सप्टेंबर ते शनिवार दि.१९ सप्टेंबर या काळात हा बंद राहणार आहे. आमदार संग्रामदादा थोपटे यांचे अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली यात हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीला प्रांताधिकारी राजेंद्र जाधव,तहसीलदार अजित पाटील, नगररिषदेचे मुख्याधिकारी थोरात,पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार, गटनेते सचिन हर्णसकर, नगसेवक चंद्रकांत मळेकर, अमित सागळे आदी उपस्थित होते.
रविवार दि. १३ सप्टेंबर ते शनिवार दि.१९ सप्टेंबर सलग ७ दिवस कडक बंद करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत.
या काळात फक्त हॉस्पिटल व मेडिकल व्यवस्था चालू राहतील .तसेच पुढील निर्णय परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात येतील. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून कोरोना आजाराची वाढते संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आमदार संग्रामदादा थोपटे यांनी केले आहे.
आशा प्रकार स्थानिक प्रशासन स्तरावर केलेला हा तिसरा बंद आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. बंद हा करोनावर उपाय नाही हे आता सर्व जग ओळखून आहे. बंद केल्याने करोनाची साखळी तोडता येत नाही हेही सिद्ध झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे तसे अशक्य आहे. त्यामुळे वारंवार बंद करून नागरिकांना वेठीस धरण्यापेक्षा उपाययोजनांवर प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. चांगल्या आरोग्य सेवा मिळतील यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. बाधितांची संख्याही आता वाढतच जाणार आहे. पण तालुका व शहरातील एकही रुग्ण दगावणार नाही, मृत्यूदर हा शून्य असेल यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
आरोग्य व्यवस्था सक्षम असल्याचा दावा
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मनुष्यबळासह उपचारासाठी आवश्यक बाब्ींचा पुरवठा करण्यात येत असून स्थानिक प्रशासनाने चांगली व्यवस्था केली आहे. रुग्ण वाढ होत असली तरी प्रशासनाकडे तशी व्यवस्था आहे. आगदी दिवसाला पाचशे रुग्ण सापडले तरी व्यवस्था होईल असा दावा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी केला आहे.
चार ग्रामपंचायती अतिसंक्रमीत
जिल्ह्याात शंभर ग्रामपंचायतींमध्ये पंधरापेक्षा जास्त रुग्ण आहेत. यात भोर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात भोलावडे, शिंदेवाडी, वेळू, भोंगवली या गावांचा समावेश आहे. तर दहापेक्षा जास्त रुग्ण असलेल्या 12 ग्रामपंचायती आहेत. या सर्व ग्रामपंचायतीतील सर्व नागरिकांची घरोघरी जात त्यांची तपासणी करण्यात येणार संशयीत असल्यास तत्काळ अलगीकरण करण्यात येणार असून करोनाची साखळी तोडण्यात येणार आहे.
0 Comments