जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : कोवीड-19 रुग्णालये आणि कोवीड-19 हेल्थ सेंटरमधील ऑक्सीजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असून राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13/03/2020 पासून लागू केला आहे.
राज्यात तसेच जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोवीड-19 रुग्णांना पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
राज्यात पुरेसे ऑक्सीजनचे उत्पादन होऊनसुध्दा वितरण योग्य प्रकारे होत नसल्यामुळे काही ठिकाणी तात्पुरता तुटवडा होत असल्याची शक्यता आहे. भविष्यात कोवीड-19 रुग्णसंख्येत वाढ होईल आणि ऑक्सीजनची गरज वाढेल ही बाब लक्षात घेता ऑक्सीजन पुरवठा सुरळीत होण्याचे दृष्टीने सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तसेच जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर समिती गठीत केली आहे. पुणे जिल्हयात कोरोना विषाणू ( कोवीड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडितपणे सुरु राहण्याकरीता ऑक्सीजन पुरवठा संनियंत्रणासाठी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय साधून नियोजन करणे
सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे यांनी उत्पादकांशी समन्वय व बॉटलींग प्लॅंटमधून वाटपाचे नियोजन करणे. महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे यांनी उत्पादनात वाढ व उत्पादकांशी समन्वय साधणे. प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे व पिंपरी यांनी वाहतूक-टॅंकर समन्वय राहण्याबाबतचे नियोजन करणे. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील कोविड-19 रुग्णांना औषधोपचार करणाऱ्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका आणि खाजगी रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सीजनची माहिती रुग्णालयानुसार संकलित करावी आणि निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांना द्यावी. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी जिल्हयातील कोविड-19 रुग्णांना औषधोपचार करणाऱ्या सर्व सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महानगरपालिका, आणि खाजगी रुग्णालयांना प्रतिदिन लागणाऱ्या ऑक्सीजनची मागणी नोंदविणे.
जिल्हास्तरीय समितीची कार्ये
1. समितीने दैनंदिन ऑक्सीजनची गरज व ती पुरविणाऱ्या बॉटलिंग प्लांट्स बल्क सप्लायर्स यांच्या सतत संपर्कात राहून प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सीजन प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी. जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पावसाळयासाठी स्थापन करण्यात आलेल्या कट्रोल रुमला ऑक्सीजन पुरवठयाची जबाबदारी देण्यात येत आहे आणि कंट्रोल रुम दिनांक 31/12/2020 पर्यंत सुरु ठेवण्यात येत आहे. कंट्रोल रुमचा वापर ऑक्सिजन पुरवठ्याशी संबंधित अडचणी सोडवणूक करण्यासाठी करावा. पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कंट्रोल रुम दुरध्वनी क्र. 020-26123371 वर संपर्क साधावा. या कंट्रोल रुमला काही अडचण असल्यास त्यांनी एफडीए कंट्रोल रुम दूरध्वनी क्र. 022-26592364 व टोल फ्री क्र. 1800222 365 संपर्क साधावा. यानुसार समितीने कार्यवाही करुन कोणत्याही रुग्णालयात ऑक्सीजन पुरवठा खंडीत होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.
0 Comments