ब्रेकिंग न्यूज

6/भोर/ticker-posts

करोनाबाबत आरोग्यमंत्र्यांच्या मुलाखतीत आपल्या मनातील प्रश्नांचा उलगडा..


 करोना साथरोगआजारामुळे आपलं जीवनच बदलून गेले आहे. गेली साडेपाच महिने आपण टाळेबंदीत होता. आता हळूहळू सर्व जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र असे असले तरी करोनाचा प्रादुर्भाव काही कमी होताना दिसत नाही. यापुढेही तशी काही शक्यता दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नातेसंबंधावर याचा दूरगामी परिणाम होत असून आशा काळात करावे तरी काय असे अनेक प्रश्न आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेच्या मनातील काही प्रश्नांची उत्तरे नुकतीच सह्यााद्री वाहिनीवर झालेल्या मुलाखतीत दिली आहेत.  ‘कोरोनाशी दोन हात’ या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल मुथ्था यांनी ‘कोरोना: अवास्तव भीती व गैरसमज’ याविषयी त्यांच्याशी केलेल्या चर्चेतील काही निवडक व आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे खास रायगड टाइम्सच्या वाचकांसाठी देत आहोत...

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

भोर : कोरोनाच्या भीतीमुळे नात्यांवर कसा परिणाम होतो याचं उदाहरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाशी दोन हात या चर्चासत्राच्या कार्यक्रमात दिलं. आई-मुलाचं नातंसुद्धा कोरोनाच्या भीतीमुळे दुरावल्यासारखे झालं. त्यामुळे आपली नाती तोडू नका, आईशी असलेली नाळ तोडण्याची आपली संस्कृती नाही. कोरोनाची भीती बाळगू नका व कुणालाही वाळीत टाकण्याची मानसिकता ठेऊ नका. शिक्षित व्हावं योग्य ती खबरदारी घ्यावी परंतु नात्यातील, संबंधातील प्रेम-जिव्हाळा कमी होऊ देऊ नका, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात केले.

टोपे म्हणाले, लोक भीतीपोटी खूप चुका करतात. एखादा कोरोनाबाधीत झाला तर त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही. पनवेलमधील घटनेचे उदाहरण त्यांनी दिले. ज्यामध्ये आई असिम्प्टोमॅटीक होती, ती बरी झाली. ती बरी झाल्यानंतर तिला घरात घ्यायची तिच्या मुलाला भीती वाटायला लागली. त्याला वाटलं आईमुळे मला व घरातील इतरांना प्रादुर्भाव होईल. हा आजार बरा होतो मात्र हा आजार झालेल्यांशी वाळीत टाकल्याप्रमाणे वागू नका. नातेसंबंध जपत आजारावर मात करा.

राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये किमान ५००० रुग्ण असे आहेत ज्यांचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. ९० वर्षे वयापुढील जवळजवळ ६०० लोक बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती न बाळगता सावधतेने आणि काळजी घेऊन त्याचा सामना करा.

नागरिकांना दिलासा देताना आरोग्यमंत्री म्हणाले, कोरोनाबाधित रुग्ण १० ते १२ दिवसांमध्ये या आजारातून बाहेर पडू शकतात. ही लक्षणांवर आधारीत उपचार पद्धती आहे. त्यात काही मोठी शस्त्रक्रिया वगैरे असे काहीच नाही. सायटोकॉईन स्टॉर्म मध्ये आपले शरीर आपल्याच सेल्सला मारते. सायटोकॉईन स्टॉर्म चे एक कारण कधीकधी काहीशी भीतीसुद्धा असते. त्यामुळे भीती बाळगू नका.  आपल्याला प्रादुर्भाव होऊ नये ह्याा गोष्टीचे आपण शिक्षण घ्यावे. आपण काळजी घेऊन काम केले तर काही अडचण येत नाही. भीती न बाळगता, काळजी घेत काम करत रहावे हाच सध्या कोरोनाबरोबर जगण्याचा महत्त्वाचा सिद्धांत आहे.   

संसर्गाचे प्रमाण जास्त हा कोरोना विषाणूचा मुख्य गुणधर्म आहे. परंतु याची जागतिक टक्केवारी पाहिली तर ८० टक्क्यांपर्यंत लोकं असिम्प्टोमॅटीक आहेत. कोरोनाची तीन स्वरूप आहेत सौम्य, मध्यम आणि गंभीर. सौम्य स्वरूपासाठी १० दिवस सीसीसीमध्ये (कोरोना केअर सेंटर) राहून लक्षणांवर आधारित उपचार देऊन त्यांची फक्त प्रतिकारशक्ती वाढवतो. उर्वरित १५ टक्के लोकांना लक्षणे असतात. ताप, सर्दी, खोकला असतो, काही लोकांच्या तोंडाची चव जाते, काही लोकांना जेवावसं वाटत नाही. उर्वरित काही २ ते ३ टक्के रुग्ण गंभीर असतात.

आज साडेसहा लाख लोक बाधित झाले आहेत. चाचण्यांसाठी शासनाच्या २७० ते ७५ लॅब व  खासगी ७० ते ७५ अशा सगळ्या मिळून ३६९  लॅबमधून २४ तासात रिपोर्ट येत आहेत. अँटीजेन टेस्ट आणि अण्टीबॉडी टेस्ट वाढवल्या आहेत. मी पुन्हा एकच सांगेन की, गरीब माणसाला डोळ्यासमोर ठेवून घेतलेले हे सगळे निर्णय आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही, असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुखणं अंगावर काढू नका..

टापे यांनी ज्यांना हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यासारखे विकार आहेत त्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सामान्य माणसापेक्षा जास्त असते. अशा कोमॉर्बीड अवस्थेतील रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यात तो रुग्ण दगावला तर त्याचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद होते. राज्य शासनाने या संदर्भात पारदर्शकता व प्रामाणिकता याला फार महत्त्व दिले आहे. आपण ॲॅनॅलिसीस केले तर २४ तासांतले मृत्यू, ४८ तासांतले मृत्यू यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचे एक कारण आहे की लोक दुखणे अंगावर काढतात. लवकर निदान झाले तर त्याचा उपचार तत्काळ करता येतो. बऱ्याचदा हॅपी हायपोक्सिया किंवा सायलेंट हायपोक्सिया  आपण म्हणतो. बऱ्याचदा एखादी व्यक्ती नॉर्मल असते परंतु त्याच्या रक्तातीलं ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले असते ते लक्षात येत नाही. त्यासाठी प्रत्येकाने पल्स ऑक्सिमीटरद्वारे सातत्याने तपासणी केली पाहिजे. आपले एसपीओटू (रढड2) (म्हणजेच रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण) पर्सेंटज ९५ च्या खाली गेले तर निश्चिातपणे दवाखान्यात जाऊन दाखल होणे गरजेचे आहे. यामुळे मृत्यूदर कमी होऊ शकतो. नागरिकांनी या सगळ्या बाबींना प्रतिसाद देणे गरजेचे आहे.

साधारणपणे कोरोना विषाणूचा इनक्युबेशन पिरिअड  १४ दिवसांचा आहे. एखाद्याला संसर्ग झाल्यानंतर चौथ्या ते पाचव्या दिवसापर्यंत लक्षणे दिसतात. असिम्प्टोमॅटीक असेल तर दहाव्या दिवसापर्यंत व्हायरल लोड कमी होऊ शकतो. परंतु दहाव्या दिवसानंतर डिस्चार्ज मिळाल्यावर चार दिवस आपण होम क्वारंटाईन राहणे गरजेचे आहे. शेवटी याचा प्रसार टाळायचा असेल तर आपण "दो गज की दूरी" ठेवणे आवश्यक आहे.

यावेळी टोपे यांनी  क्वारंटाईन, होम क्वारंटाईन, इन्स्टिटयूशनल क्वारंटाईन याबाबत सविस्तर माहिती दिली. एखादी व्यक्ती बाहेर फिरून आला कुठून तरी इन्फेक्शन घेऊन आला व पॉझिटिव्ह झाला तर आपण "थ्री टी" प्रिन्सिपलप्रमाणे पहिल्यांदा त्या व्यक्तींचे ट्रेसिंग करतो. या व्यक्तीमुळे जे कुटुंबातील सदस्य असतात ते हाय रिस्क मध्ये येतात. ही व्यक्ती जिथे जिथे संपर्क करून आलेली असेल तिथल्या व्यक्तींना आपण लो रिस्क म्हणतो म्हणजे जिथे कमी काळ  संपर्क झाला. हाय रिस्क आणि लो रिस्क मिळून किमान दहा ते पंधरा लोकांचे तरी आपण ट्रेसिंग केले पाहिजे व त्यांच्यावर ट्रॅकिंग ठेवले पाहिजे.

दाटीवाटीच्या वस्तीमध्ये लोकं  राहत असतील किंवा एका घरात १० ते १५ लोकं राहत असतील तर अशा वेळी आपण त्यांना होम क्वारंटाईन तर करू शकत नाही. त्यांना आपण एका संस्थेमध्ये ठेवतो. ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन (संस्थात्मक अलगीकरण) म्हणतो. ज्यांच्याकडे  मोठा फ्लॅट आहे, बंगला आहे, त्यामध्ये बऱ्याच खोल्या आहेत, घरात सगळे सदस्य वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू शकतात आणि स्वत:ला एकमेकांपासून दूर ठेवत असतील तर त्याला आपण होम क्वारंटाईन म्हणतो. यासाठी आपण त्रिस्तरीय हॉस्पिटल्स केलेत.

एक म्हणजे कोवीड केअर सेंटर (सीसीसी), डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल सेंटर (डीसीएचसी) आणि तिसरं डेडीकेटेड कोवीड हॉस्पिटल (डीसीएच). रुग्ण पॉझिटिव्ह आहे परंतु लक्षणे नाहीत त्यांना आपण सीसीसीमध्ये ठेवतो. बरेच लोक  म्हणतात, माझा बंगला आहे, माझा मोठा फ्लॅट आहे, मला काही लक्षणे नाहीत. अशा वेळेस मी माझ्या घरीच थांबेल. मुख्यत: संसर्ग टाळण्यासाठी या गोष्टी आहेत, एवढाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे. 

होम आयसोलेशनमध्ये अशी घ्यावी काळजी 

बाधीत रुग्णाने एका स्वतंत्र खोलीत राहायचे. दुसऱ्यांना संसर्ग होणार नये याची काळजी घ्यायची. त्यासाठी सगळ्या व्यवस्था स्वतंत्र असायलाच हव्यात. जेणेकरून त्या रुग्णाच्या संपर्कात कोणीही येणार नाही ही खबरदारी घेतली पाहिजे. पॉझिटिव्ह रुग्णाला सीसीसी, डीसीएचसी किंवा डीसीएचमध्येच ठेवतो. परंतु जे लोक स्वत:ची १०० टक्के काळजी घेऊ शकतात ते लोक, पीपीई किट घालून, फेस शिल्ड, मास्क, ग्लोव्हज या सगळ्या गोष्टी वापरून घरी काळजी घेऊ शकतात. एकमेकाला संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली तर होम आयसोलेशनने  राहणे सुरक्षित आहे.

महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था

ज्यांना लक्षणे नाहीत अशा रुग्णांना कोवीड केअर सेंटर्स ठेवण्याची व्यवस्था आहे. राज्यात साधारण २००० असे सेंटर्स आहेत. महाराष्ट्रात ३५६ तालुक्यांमध्ये कितीतरी कोव्हिड सेंटर्स आहेत. दोन ते अडीच लाखांच्यावर खाटा आहेत. आजच्या घडीला आपल्याकडे दीड लाख रुग्ण आहेत. परंतु अडीच लाखांच्यावर आपल्याकडे सीसीसीचे बेड्स आहेत. यामध्ये  ऑक्सिजनची सोय नसलेले बेड्स, ऑक्सिजनची सोय असलेले बेड्स, आयसीयू  बेड्स आणि व्हेंटीलेटर्स असलेले आयसीयू बेड्स अशा बऱ्याच कॅटेगरी केल्या आहेत.

आता जम्बो फॅसिलिटीज म्हणजे एका जागेवर १००० ते २००० बेड्स असतात. त्या प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय असते. ठराविक वॉर्डमध्ये डॉक्टर्स असतात. जेवणाची उत्तम व्यवस्था असते. स्वच्छ स्वच्छतागृह असतात. सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते. काढा, हळदीचे गरम दूध पौष्टिक जेवण दिले जाते. प्रतिकारशक्ती वाढावी या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन टोपे यांनी यावेळी केले. 

१०७ वर्षांचे वृद्धही कोरोनावर मात करू शकतात...

बाधीत रुग्णाने मन खंबीर ठेवून कोरोनावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा नये याचीही खबरदारी घेतलीच पाहिजे. जालन्यामध्ये १०७ वर्षांची महिला, तिचा मुलगा जो ८० वर्षांचा आहे, त्यांचा मुलगा जो साधारण ६० ते ६५ वर्षांचा आहे आणि त्यांची मुलगी असे सर्वजण कोरोनामधून बरे होऊन घरी परतलेले आहेत. म्हणजे १०७ वर्षाची महिला सुद्धा कोरोनावर मात करू शकते. गरज आहे आपल्या मनाची इच्छाशक्ती व प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्याची.


Post a Comment

0 Comments